शेतकऱ्यांनी ज्वारी कडे का फिरवली पाठ…?

शेतकऱ्यांनी ज्वारी कडे का फिरवली पाठ…


मागील वर्ष (2023) हे जागतिक भरडधान्य वर्ष म्हणून साजरं करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील वर्षभरात जागतिक पातळीवरही या ना त्या कारणानं भरडधान्याला प्रोत्साहन दिल्याची शेखी मिरवली. माध्यमांमध्येही भरडधान्याचं महत्त्व आणि उपयुक्तता यावर वरवर चर्चा झाली. परंतु या चर्चेत भरडधान्यांकडे शेतकऱ्यांनी पाठ का फिरवली, यावर अपवाद वगळता फारशी चर्चा झाली नाही.

भरडधान्यांमध्ये ज्वारी हे महत्त्वाचं पीक आहे. पण मागील 20 वर्षांत राज्यातील ज्वारीखालील क्षेत्र 50 लाख हेक्टरवरून 15 लाख हेक्टरवर घसरले आहे. मागील दोन दशकांत ज्वारीच्या बाजारभावाची तुलना केली तर त्यामध्ये फारशी सुधारणा झाल्याचं दिसत नाही. 2022/23 मध्ये रब्बी ज्वारीला खुल्या बाजारात ऐन आवकेच्या हंगामात प्रति क्विंटल सरासरी 2 हजार 500 ते 2 हजार 700 रुपयांच्या दरम्यान दर मिळत होता.

विशेष म्हणजे हा दर केंद्र सरकारने जाहीर केलेल्या किमान आधारभूत किमतीच्याही (हमीभाव) खाली होता. ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च आणि बाजारभावाचा ताळमेळ जुळत नाही. त्यामुळे ज्वारीचा कायम दबावात राहणारा बाजारभाव परवडत नाही, असं शेतकरी सांगतात. उत्पादन खर्चही भरून निघत नसल्याने ज्वारी आतबट्ट्याची ठरत असल्याने शेतकऱ्यांनी या पिकाकडे पाठ फिरवली आहे.

वगळून भाव…

खरीप आणि रब्बी मिळून 23 पिकांसाठी केंद्र सरकार दरवर्षी किमान आधारभूत किमती (हमीभाव) जाहीर करतं. हमीभाव जाहीर केल्यानंतर खुल्या बाजारातील शेतीमालाचे दर हमीभावाच्या खाली गेले तर सरकारनं वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून खरेदीसाठी बाजारात उतरून खरेदी करणं अपेक्षित आहे.

जेणेकरून खुल्या बाजारातील दरावर दबाव राहणार नाही आणि शेतकऱ्यांना किफायतशीर दर मिळेल. परंतु खरी मेख म्हणजे 23 पैकी गहू आणि तांदूळ वगळता अन्य पिकांची तुटपुंजी खरेदी करून सरकार शेतकऱ्यांची बोळवण करतं. या 23 पिकांमध्ये ज्वारीचाही समावेश आहे. परंतु ज्वारीची तर केवळ नैवद्याला वाहिलेल्या घासासारखी खरेदी होत आली आहे. ज्वारी खरेदीसाठी सक्षम यंत्रणाच नाही.

दुसरं म्हणजे खरीपात ज्वारीची उत्पादकता एकरी 11 क्विंटल, तर रब्बीत 7 क्विंटल आहे. त्यामुळे दोन्ही हंगामांतील ज्वारीसाठी वेगवेगळा हमीभाव जाहीर करणं आवश्यक आहे. रब्बी ज्वारीची प्रामुख्याने अन्नधान्य पीक म्हणून पेरणी केली जाते; तर खरीप ज्वारी कडब्यासाठी. अन्नधान्य पीक म्हणून ज्वारीला प्रोत्साहन द्यायचं असेल, तर सरकारला दोन्ही हंगामांतील ज्वारीसाठी वेगवेगळा हमीभाव जाहीर करावा लागेल. रब्बीसाठी खरिपाच्या तुलनेत दुप्पट हमीभाव द्यावा लागेल. तसेच सरकारला ज्वारीची खरेदीही करावी लागेल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *